म्हणणे मांडण्यासाठी ९ नगरसेवकांनी मागितला वेळ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नगरसेवकांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आणि तीन अपत्यांच्या तक्रारींवरून दाखल अपात्रता प्रकरणी सोमवारी (दि. १७) पहिली सुनावणी पार पडली. पहिल्या टप्प्यात नऊ नगरसेवकांच्या नोटीसबाबत झालेल्या या सुनावणीदरम्यान सविस्तर बाजू मांडण्यासाठी नगरसेवक व त्यांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितला. महापालिका आयुक्तांनी ही मागणी मान्य करत पुढील तारीख नंतर जाहीर
करण्याचे स्पष्ट केले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अपात्रतेसाठी पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांचा मात्र हिरमोड झाला आहे.
महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काही नगरसेवकांविरोधात तीन अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामप्रकरणी तक्रारी दाखल करत या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. तक्रारींआधारे प्रशासनाने ३७नोटीस बजावल्या. एमआयएमचे १८, भाजपचे ६
आणि शिवसेना शिंदे गटाचा १ असा एकूण २५ नगरसेवकांचा यात समावेश आहे. १५ सप्टेंबरला शेवटची सुनावणी
ऑगस्ट महिन्यात १७ व २४ रोजी आणि सप्टेंबर महिन्यात ७ आणि १५ रोजी आयोजित सुनावणीला हजर राहण्याची सूचना नोटिसद्वारे प्रशासनाने केली होती. त्यानुसार सोमवारी पहिली सुनावणी झाली. यावेळी आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त विकास नवाळे, अपर्णा थेटे आदींची उपस्थिती होती. एक-एक करत ९ नगरसेवकांच्या
तक्रारींवर सोमवारी सुनावणी पार पडली. तक्रारदारांनी केलेले आरोप, पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर आमचे सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती नगरसेवकांनी केली असता, आयुक्तांनी त्यांची विनंती मान्य केली. नगरसेवक अपात्र प्रकरणी दाखल तक्रारींवर शेवटची सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे, त्यानंतरच सुनावणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













